Manoj Jarange Patil on Maratha Reservation : ‘मराठ्यांना बाजूला ठेवून आम्ही सत्तेवर बसू आणि त्यांचं वाटोळं करू हा देवेंद्र फडणवीसांचा हट्ट होता. सत्तेच्या बळावर तो त्यांनी पूर्ण केला. आता मतदान मराठ्यांच्या हातात आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा सुपडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकारनं त्यास योग्य तो प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं दसऱ्याला झालेल्या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. आचारसंहिता लागण्याच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर उलथापालथ घडवू असं जरांगे म्हणाले. त्यानुसार त्यांनी आज आपली भूमिका जाहीर केली.
'ज्या मराठ्यांनी ह्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल यासाठी संपूर्ण सत्तेचा वापर फडणवीसांनी केला. कष्टकरी, गोरगरीब मराठ्यांना एक आशा-अपेक्षा होती, सरकार आरक्षण देईल असं वाटत होतं. ती आशा सरकारनं संपवली, असा संताप जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
‘मराठ्यांचं आंदोलन आणि मराठा समाज एक होऊ द्यायचा नाही. त्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. त्यांच्या मुलांना मोठं होऊ द्यायचं नाही हा निर्धार फडणवीसांनी केला होता. तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. वेगवेगळ्या १७ जाती ओबीसी प्रवर्गात घातल्या, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. फडणवीसांची खुन्नस मराठ्यांना आधीच समजली होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवायचा हा क्षत्रियाचा धर्म आहे. त्यानुसार आम्ही वागलो. पण त्यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. त्यासाठी सगळे डाव टाकले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
'त्यांचे सर्व डाव खेळून झालेत. आता आपली वेळ आहे. चूक होऊ देऊ नका. तुमच्या मतांचा योग्य वापर करा. या सरकारनं जाणूनबुजून आपला अपमान केलाय. आपली दखल घेतली नाही. त्यांनी आपल्याला डिवचण्यासाठी त्यांनी इतर जाती ओबीसी आरक्षणात घातल्या आहेत. तुमच्या जातीवर वार सुरू केलेत. तुमचा घात करायचा असं त्यांनी ठरवलं आहे. त्यांची जिरवायलाच हवी आता आपल्या मुलाबाळांना कसं मोठं करायचं आहे हे आपणच ठरवायचं आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना मोठं करायचं आहे की आमदाराला निवडून द्यायचं आहे हे आता ठरवावं लागेल, असं आवाहन जरांगे यांनी केलं.
मराठा समाजाच्या मतांशिवाय आपण सत्तेत येऊ शकतो असा ह्या लोकांचा भ्रम आहे. पण त्यांना माहीत नाही हा फक्त मराठा समाजाचा प्रश्न नाही. हा दलितांचा, मुस्लिमांचा, शेतकऱ्यांचा, धनगरांचा आणि इतर छोट्या-छोट्या समाजाचाही प्रश्न आहे. त्या सर्वांवर अन्याय होतोय. या सगळ्यांना डावलून तुम्ही सत्तेत जाऊच शकणार नाही, असं त्यांनी ठणकावलं.