Manoj jarange maratha protest hunger strike: मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती ही कलपासून खालावली आहे. दरम्यान, त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. त्यांनी आता पर्यंत या मागणीसाठी अनेक आंदोलने आणि उपोषणे देखील केले आहेत. दरम्यान, त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट मुंबईत मोर्चा नेला होता. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर जमले होते. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, केवळ अध्यादेश काढून सरकारने तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करण्यात आला होता. या अध्यादेशाची अंमलबजावणी पंधरा दिवसांत होणार होती.
मात्र, १५ दिवस होऊनही सरकारने अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी १० फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी पाणी सुद्धा प्यायले नसल्याने त्यांची प्रकृती रविवार रात्री पासून बिघडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, त्यांच्या उपचारासाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी गेले असता त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास सरकारच्या अडचणी वाढणार आहेत.
दरम्यान, जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आंतरवाली सराटी येथे येऊ लागले आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक या ठिकाणी येऊ लागले आहेत.
दरम्यान, मजोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याबाबत कोणतेही पावले उचलतांना दिसत नाहीत. अजूनही सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्याबाबत सरकारचे शिष्ट मंडल आलेले नाही. दरम्यान, आज सोमवारी मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.