Manoj Jarange : मराठा आरक्षण तातडीने लागू करावे यासाठी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. गेले पाच दिवस त्यांनी काही खाल्ले व प्यायले नसल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांनी उपचार करण्यास नकार दिला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना आग्रहकेल्याने अखेर त्यांनी उपचार घेतले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे, बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे तसेच मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत या मागण्या त्यांनी सरकारला केल्या आहेत. त्यांनी पाच दिवस काही खाल्ले नसल्याने शुक्रवार पासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना डॉक्टरांनी उपचार घेण्याची विनंती केली मात्र, त्यांनी ती मान्य केली नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी देखील त्यांना उपचार घेण्याचे आग्रह केले होते. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना फोन केला होता. अखेर सर्वांचा आग्रह असल्याने त्यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री २ च्या सुमारास जरांगे पाटील यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. त्यांना सलाईन लावण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही पाटील यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले. मात्र, त्यांनी काही न खाल्ल्याने त्यांना मोठा अशक्तपणा आला होता. जरांगे त्यांच्या सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालत होते. जरांगे यांना उठणे बसने देखील कठीण झाले आहे.
दरम्यान, त्यांनी उपोषण सुरू केल्या पासून अद्याप सरकारने कोणतही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्ष भरापासून जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांनी सरकार वर टीका केली आहे. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी सहा वेळा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.