Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू

Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू

Jan 06, 2025 09:17 PM IST

Manmad Accident : भरधाव ट्रकखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. दोघांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनमाडमध्ये भीषण अपघात
मनमाडमध्ये भीषण अपघात

नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मनमान- चांदवड रोडवर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हा अपघात झाला. भरधाव ट्रकखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांच्या कुटूंबाला धक्का बसला असून शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच ही घटना घडली. ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडलं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. 

कसा घडला अपघात -

वैष्णवी व आदित्य शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या सुमारास घरी जात असताना हा अपघात झाला. ट्रक चांदवडकडून मनमाडकडे जात होता. वैष्णवी व आदित्य मोटारसायकलीने शाळेतून घरी चालले होते. रस्त्यात अचानक मोकाट गायी आल्याने त्यांना वाचवताना संतूलन जाऊन मोटारसायकल रस्त्याच्या मध्येच पडली. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाला गाडीवरील नियंत्रण राखता न आल्याने ट्रकने दोघांनाही चिरडले. 

या अपघातात मोटारसायकलवरील आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकाण (दोघंही रा. हनुमान नगर) या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दोघांच्या मृतदेहांचा चेंदामेंदा झाला होता. त्यांची ओळख पटवणेही मुश्किल झाले होते. अपघातानंतर स्थानिकांनी ट्रक थांबवून चालकाला पोलिसांच्या हवाली केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमान उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रस्त्यावरील  मोकाट जनावरांमुळे दोन शाळकरी मुलाचा हकनाक जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर