मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manisha Kayande: शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी किरीट सोमय्यांना हातोडाच दाखवला! म्हणाल्या, जा आणि…

Manisha Kayande: शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी किरीट सोमय्यांना हातोडाच दाखवला! म्हणाल्या, जा आणि…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 20, 2022 04:56 PM IST

Manisha Kayande slams Kirit Somaiya: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा शिवसेनेच्या रडारवर आले आहेत.

Manisha Kayande-Kirit Somaiya
Manisha Kayande-Kirit Somaiya

Manisha Kayande: भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका देत त्यांच्या मुंबईतील बंगल्याचं बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर शिवसेनेनं राणेंसह भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अक्षरश: घणाघात केला आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयानं राणेंच्या बंगल्याच्या बाबतीत दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सत्तेचा अहंकार कितीही केला तरी न्यायदेवतेपुढं सर्वांना झुकावंच लागतं हे दर्शवून देणारा हा निर्णय आहे, असा टोला कायंदे यांनी हाणला आहे.

शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याची भाषा करणारे किरीट सोमय्या यांच्यावरही कायंदे यांनी सडकून टीका केली. 'सोमय्या हे थर्माकोलचे हातोडे घेऊन गावोगावी फिरत असतात, पण मी त्यांना खराखुरा हातोडा देतो. हा हातोडा घेऊन त्यांनी नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगल्यावर पहिला घाव घालावा, असं आव्हान त्यांनी सोमय्यांना दिलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईतील जुहू इथं नारायण राणे यांचा 'अधीश' नावाचा बंगला आहे. पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून या बंगल्यात बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या आधारे मुंबई महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली होती. हे बांधकाम नियमित करण्याचा राणेंचा अर्ज महापालिकेनं फेटाळून लावला होता.त्यामुळं नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं हा अर्ज फेटाळल्यानंतर बंगल्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीनं महापालिकेकडं पुन्हा एकदा बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशाकडं बोट दाखवत हा अर्ज फेटाळण्यात आला. आधी न्यायालयाची परवानगी घ्या असं महापालिकेनं सांगितलं. त्यानुसार कंपनीनं दुसऱ्यांदा याचिका दाखल केली होती.

राणे यांच्या बंगल्याविरोधात कारवाई सुरू झाली, तेव्हा महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यानं त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र, आता न्यायालयानंच दणका दिल्यानं शिवसेनेनं संधी साधत राणे व भाजपवर निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point