Sanjay Raut Threat Case Updates: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने शोधून काढलं. तसेच पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संजय राऊत यांना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याचा मॅसेज करण्यात आला. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी राहुल तळेकर या २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. हा तरुण एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे चौकशीत समोर आले. त्याने संजय राऊतांना असा मॅसेज का केला? त्याला असे करण्यास कोणी सांगितले का? याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहे.
जीवे मारण्याच्या धमकीच्या मॅसेजवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, "धमक्या येतच असतात, पण विरोधकांना आलेल्या धमक्यांना सरकार गांभीर्याने घेत नाहीये. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे", असे संजय राऊतांनी म्हटले.