Mumbai: बोलणं बंद केलं म्हणून तरुणानं महिलेचा गळा चिरला; स्वत: चाही आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील घटना-man stabs partner after she stopped talking to him attempts suicide ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: बोलणं बंद केलं म्हणून तरुणानं महिलेचा गळा चिरला; स्वत: चाही आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील घटना

Mumbai: बोलणं बंद केलं म्हणून तरुणानं महिलेचा गळा चिरला; स्वत: चाही आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील घटना

Sep 14, 2024 04:14 PM IST

Man stabs Women In Mumbai: बोलण्यास नकार दिला म्हणून एका व्यक्तीने महिलेचा गळा चिरून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबईतील भांडुप परिसरात ही घटना घडली.

मुंबई: भांडुपमध्ये बोलण्यास नकार दिला म्हणून तरुणाने महिलेचा गळा चिरला
मुंबई: भांडुपमध्ये बोलण्यास नकार दिला म्हणून तरुणाने महिलेचा गळा चिरला (HT_PRINT)

Mumbai News: मुंबईतील भांडुप परिसरात धक्कादायक घटना घडली. बोलण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाने ३८ वर्षीय महिलेचा गळा चिरला. त्यानंतर स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर मुलुंड सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, हल्लेखोर तरुणावर सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पीडित महिलेच्या पतीचे २०१६ मध्ये निधन झाले असून ती आपल्या १५ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षीय बहिणीसोबत भांडुप पश्चिमेकडील गावदेवी टेकडी येथे राहते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संबंधित महिला घरकाम करते. तर, आरोपी याच परिसरात राहतो. आरोपी आणि तक्रारदार पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि रिलेशनशिपमध्ये होते, अशी माहिती समोर आली.

चाकूने महिलेचा गळा चिरला

मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांमुळे महिलेने आरोपीशी बोलणे बंद केले. दरम्यान, बुधवारी आरोपी आणि महिला यांची भेट झाली. पण महिलेने आरोपीशी संवाद साधण्यास नकार दिला आणि त्याला जाण्यास सांगितले. मात्र, आरोपीने तिथून जाण्याऐवजी तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने महिलेचा गळा चिरला. त्यानंतर स्वत:ही आपल्या गळ्यावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. अशी माहिती भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली.

महिलेच्या मानेला १५ टाके, आरोपीची प्रकृती चिंताजनक

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, आरोपीची प्रकृती पाहून त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेला मुलुंड सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या मानेला १५ टाके पडले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, आरोपी गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती खंडागळे यांनी दिली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८ (१) (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने इजा पोहोचविणे), ११८ (२) (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी गंभीर इजा करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे) तसेच कलम ३७ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
विभाग