मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. मात्र तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. आता साताऱ्यातील माण येथील तरुणाने महाराज आमची चूक झाली, आम्हाला क्षमा करा, असं म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंत ३ किलोमीटर नाक घासत आंदोलन केलं. महेश करचे असे या तरुणाचे नाव आहे.
महेश करचे या तरुणाने या आंदोलनामध्ये त्यांनी विविध फलक लावले होते. आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन महाराज आम्हाला माफ करा, असाही बॅनर लावला होता. महेशने आपल्या आंदोलनावेळी 'महाराज आम्हाला माफ करा'असं बॅनर हातात घेतलं होतं. पोलिसंनी नंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन महाराज आम्हाला माफ करा अशा घोषणा दिल्या. या आंदोलकांना नंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात राज्यातील जनतेची माफी मागितल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली. शिंदे म्हणाले की, महाराजांची माफी मागायला, त्यांच्यासमोर १०० वेळा नतमस्तक व्हायला मला काहीही कमीपणा वाटणार नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर पुतळा दुर्घटनेबाबत जाहीर माफी मागितली आहे. तसंच ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांचीही माफी मागितली आहे.
मोदींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, २०१३ मध्ये जेव्हा भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं त्यावेळी पहिल्यांदा मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. एक भक्त आपल्या आराध्य दैवताला जशी प्रार्थना करतो त्याच भक्तीभावाने आशीर्वाद घेत राष्ट्रसेवेच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे झालं ते दुर्दैवी आहे. त्यासाठी मी आज मान झुकवून आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत.