पुण्यात दरोडा, चोरी यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. यातच भोसरीतील सद्गुरुनगर परिसरात बंदुकीचा धाक दाखवत एका १८ वर्षीय तरुणाला लुटले. ही घटना घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.
पिरापा ऊर्फ सचिन येरे (वय, १९) आणि तेजस डोंगरे (वय,१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही भोसरी येथील रहिवाशी आहेत. तर, इतर दोन आरोपी विजय चव्हाण आणि निल्या साळवे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिराजुल नदाफ (वय, १८) गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घरी जात असताना आरोपींना त्याला रस्त्यात अडवले. तसेच त्याला या भागात जिवंत राहायचे असेल तर प्रोटेक्शनमनी द्यावे लागेल, असे आरोपींनी नदाफला धमकी दिली. मात्र, नदाफने पैसे देण्यास नकार दिला.
त्यानंतर आरोपींनी नदाफला मारहाण केली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या खिशातून पाचशे रुपये घेतले, अशी फिर्याद नदाफने भोसरी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ५०४ व ३४, आर्म्स अॅक्ट कलम ३ (२५) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.