वाहतुकीचे नियम मोडून स्वत:चा आणि रस्त्यावरील इतरांचा जीव धोक्यात घालणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती धावत्या कारवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत संबंधित पोलिस स्टेशनला या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली आहे.
व्हिडिओमध्ये चालक सीटवर बसलेला व्यक्ती धावत्या गाडीचा दरवाजा उघडून कारमधून बाहेर येताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो राजस्थान नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारवर चढताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो चालत्या कारच्या छतावर उभा असल्याचे दिसत आहे आणि कोणीही स्टेअरिंग हाताळताना दिसत नाही.
२८ मे रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हा आकडा अजूनही वाढतच आहे. अनेकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्येही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत झालावाड पोलीस आणि राजस्थान पोलिसांना पुढील कारवाईसाठी टॅग केले आहे.
झालावाड पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून संबंधित पोलिस स्टेशनला त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली आहे.
या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. "हे वर्तन इतर निष्पाप नागरिकांसाठी सुरक्षित नाही, त्याची ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी पुरेसे कारण आहे. पुणे पोर्शे घटनेत नुकतेच काय घडले ते आपण पाहिले आहे, असे एका व्यक्तीने पोस्ट केले आहे.
दुसऱ्याने म्हटले आहे की, "कारचा बदललेला रंग, रंगीत काचा आणि बेदरकारपणे वाहन चालविणे. त्याला खरोखरच तुरुंगात डांबायला हवे.
तिसऱ्या एकाने म्हटले की, जीवन हे स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी खूप मौल्यवान आहे. तो अशा प्रकारे वाया घालवता कामा नये.
चौथ्या व्यक्तीने कमेंट केली की, "सोशल मीडियावर केवळ व्ह्यूज/फॉलोअर्ससाठी लोक आपला आणि इतरांचा जीव का धोक्यात घालतात? कठोर कारवाई करावी लागेल. जेणेकरून इतरांनी अशा कृत्यांची नक्कल करू नये.