मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मदतीची घोषणा करणाऱ्या रामदास आठवलेंना पीडित तरुणानंच दिली ५० हजारांची ऑफर

मदतीची घोषणा करणाऱ्या रामदास आठवलेंना पीडित तरुणानंच दिली ५० हजारांची ऑफर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 20, 2022 01:20 PM IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करताच पीडितांच्या नातेवाईकाचा संताप अनावर झाला. त्यानं आठवले यांनाच मदतीची ऑफर दिली.

रामदास आठवले
रामदास आठवले

अपघाती घटनांनंतर सरकारी व पक्षीय पातळीवरून पीडितांना आर्थिक व अन्य मदत देण्याचा एक शिरस्ता आहे. त्यानुसार मदतीची घोषणा केली जाते. क्वचित अशी मदत नाकारण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, संतप्त पीडितांनी स्वत:च सरकारला पैसे ऑफर करण्याची घटना प्रथमच घडली आहे.

ठाणे जिल्ह्यातील संदप इथं हा प्रकार घडला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना पीडितांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. संदप गावातील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ७ मे रोजी घडली होती. पाणी आणण्यासाठी गेले असताना ही घटना घडली होती. मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी रामदास आठवले हे नुकतेच गावात आले होते. रिपब्लिकन पक्षाचे काही पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत होते. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं. तसंच, रिपब्लिक पक्षातर्फे अंकुश गायकवाड यांच्या कुटुंबाला ५० हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.

आठवले यांनी हे सांगताच पीडित तरुण भडकला. आम्हाला तुमची मदत नको, आम्हाला पाणी द्या. पाच वर्षांपासून आम्ही पाण्यासाठी वणवण करतोय. माझी आई, बायको, मुलं, भावजय गेली. पाण्याची व्यवस्था करायला प्रशासनाला पाच वर्षे लागतात का? आम्हाला तुमचे ५० हजार रुपये नको. मी तुम्हाला ५० हजार रुपये देतो,' असं पीडितानं आठवले यांना सुनावलं. पीडित तरुणाचा रुद्रावतार पाहून आठवलेही काहीसे वरमले होते. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पीडित तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी गावातील इतर मंडळींनी त्याला शांत करत बाजूला नेले.

भोपर-देसलेपाडा या गावाला भेडसवणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.

IPL_Entry_Point