Gondia Man Kills Mother and Suicide: गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला गावात धक्कादायक घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एका व्यक्तीने जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलकनबाई बनोठे (वय, ७५) असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर, लेखराज बनोठे (वय, ५४) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुलकनबाई आणि त्यांचा मुलगा लेखराज एकत्र राहत असून त्याला दारुचे व्यसन होते. दरम्यान, शुक्रवारी लेखराजने आई सुलकनबाई यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, सुलकनबाई यांनी नकार दिला. यामुळे संतापलेल्या लेखराज याने सुलकनबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुलकनबाई रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी लेखराज यानेही घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीने अटकेच्या भितीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याआधीही गेल्या महिन्यात मुंबईतील वरळी परिसरात कर्जाच्या तणावातून वृद्ध आईची हत्या करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने वेळेत त्याला रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचला. संबंधित व्यक्तीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असून बँकेचा हफ्ता भरणे शक्य होत नसल्याने त्याने आत्महत्येचा विचार केला. परंतु, आपल्या मृत्युनंतर आईचे काय होणार? या भितीने त्याने आधी आईची तोंड दाबून हत्या केली. नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.