Salman Khan Security Breach: सलमान खान हा शुटींगमध्ये व्यस्त असतांना त्याच्या सेटवर एका अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीर रित्या घुसखोरी करत धमकावल्याची धक्कादायक घटना उघकडीस आली आहे. त्या व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याने लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन धमकी देण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने मी बिश्नोईला फोन करून सांगू का?' अशी धमकी दिली. या संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.
लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यापासून सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. बुधवारी सलमान ज्या ठिकाणी शूटिंग करत होता, त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी पकडले. इतकंच नाही तर सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने धमकी दिली.
या प्रकरणी ज्युनिअर आर्टिस्ट शर्मा याला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. सलमान खान सेटवर शूटिंग करत असताना हा व्यक्ति त्या ठिकाणी आला. त्याने सुरक्षा रक्षकांना सलमान खानला भेटायचे आहे असे सांगितले. तो सलमानचा फॅन असल्याचं देखील त्यानं सुरक्षा रक्षकांना सांगितलं. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याला पुढे जाऊ दिले नाही. सुरक्षारक्षकांनी त्याला रोकल्याने तेव्हा त्याने रागाने बिश्नोईचे नाव घेत बिश्नोईला फोन करू का अशी धमकी दिली. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बिश्नोईचे नाव घेऊन आरोपी अडचणीत आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
एप्रिलमहिन्यात सलमानच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर सलमानची सुरक्षा चोख करण्यात आली होती. तेव्हापासून सलमान खानचे कुटुंबीय व त्याचे चाहते खूप चिंतेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या च्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो त्याचा आगामी चित्रपट सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. ए. आर. मुरुगादोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र, धमक्यांना न जुमानता सलमान खानने आपले काम सुरूच ठेवले आहे.