Nashik News: नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ३ लहान मुलांना विहिरीत ढकलून दिल्याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मुलांना कासव दाखवतो असे म्हणत विहिरीजवळ बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांना पाण्यात ढकलून दिले. यातील एका मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना बुधवारी (१८ सप्टेंबर २०२४) संध्याकाळी वडगाव पिंगळा येथे घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अमोल लांडगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपाली संतोष घुगे (वय, ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वरद संतोष घुगे (वय १३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) हे तिघेही बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास अंगणात खेळत असताना आरोपींने त्यांना कासव दाखवतो असे सांगत विहिरीजवळ बोलावून घेतले. त्यानंतर तिघानांही पाठीमागून धक्का देत पाठीमागून ढकलून दिले आणि तेथून पळून गेला. विहिरीत पडल्यानंतर विद्युतपंपाचा पाइप आणि तारेला बांधलेली दोरी वरदच्या हाती लागली. त्याने स्वतःचा जीव वाचवत इतर दोघांनाही विहिरीबाहेर काढले.
घरी गेल्यानंतर त्यांनी याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. पण त्यांचे कपडे ओले झालेले पाहून घरच्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर मुलांनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांच्या कानावर घातला. वरद आणि अथर्व यांची आई दिपाली हिने ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमोल लांडगेला अटक केली असून आरोपींचा नेमका हेतू काय होता? याचा तपास सुरू केला. मात्र, या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पुलावर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, मृत महिलेचा मुलगा जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी दिली. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ठाणे आणि घोडबंदर रोड दरम्यानच्या मार्गावर मानपाडा पुलावर हा अपघात घडला, जेव्हा मृत महिला आपल्या मुलासह दुचाकीने जात होती. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच याप्रकरणी दोषींना बेड्या ठोकल्या जातील, अशी अपेक्षा आहे.