Viral Video : भारतात रस्त्यावर थुंकणे हा दंडनीय गुन्हा असला तरी अनेक लोकांच्या चुकीच्या सवयी काही जात नाहीत. येता-जाता लोक सर्रास सार्वजनिक ठिकाणी घाण करताना दिसतात. हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मात्र, पोलीस कर्मचारीच असं करू लागले तर…
एका व्हायरल व्हिडिओमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. पोलीस व्हॅनमधून बेधडक रस्त्यावर थुंकणाऱ्या पोलिसाला एक सामान्य माणूस जाब विचारताना व्हिडिओत दिसत आहे.
राज्यातील एक ट्रॅफिक सिग्नलवर रेकॉर्ड करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये एक पुरुष आणि एक महिला पोलिसांच्या व्हॅनशेजारी दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. दुचाकीवरील पुरुष बोट उंचावून व्हॅनमधील एका पोलिसाला खडे बोल सुनावत आहे.
‘तुमच्या अंगावर कोणी थुंकलं तर तुम्ही शांत राहाल का, असं हा दुचाकीस्वार व्हॅनमधील पोलिसाला विचारत आहे. पोलीस त्याला दटावण्याचा प्रयत्न करतो. पण हा माणूस शांत होत नाही. ‘जर कोणी तुमच्यावर थुंकलं तर तुम्ही गप्प राहाल का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे,’ असं सुनावतो. एवढ्यात सिग्नल सुटतो आणि तो माणूस निघून जातो, असं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर या व्हिडिओला ३,२२,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पोलिसाला खडे बोल सुनावल्याबद्दल नेटकरांनी या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
व्हॅनमधून थुंकल्याबद्दल पोलिसांना इशारा देणाऱ्या या दुचाकीस्वाराला सलाम. कोणतीही भीती न बाळगता योग्य गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या अशा जास्तीत जास्त लोकांची आपल्याला गरज आहे, असं एका युजरनं म्हटलं आहे.
'पोलीस आहोत म्हणजे काहीही करू शकतं असं काही लोकांना वाटतं. जर कोणी तुमच्यावर थुंकत असेल तर ते योग्य कसं असू शकतं? एखाद्या सामान्य माणसानं एखाद्या पोलिसक र्मचाऱ्यासोबत असं केलं असतं, तर त्याला शिक्षा झाली असती,' असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे.
व्हिडिओ रेकॉर्ड केला ते बरं झालं, असं एकानं म्हटलं आहे.
आणखी एका युजरनं महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत विचारणा केली आहे की, ‘महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान असेल अशी आशा आहे.’
भारतात रस्त्यावर थुंकणं म्हणजे मला या जागेची इतकी काळजी आहे की ती माझ्या लाळेनं सजवू इच्छितो, असं म्हणण्यासारखं आहे, असं काही लोकांना वाटतं, असा संताप एका युजरनं व्यक्त केला आहे.
'बसमधून थुंकणं हे जाणारी वाहने आणि सहप्रवासी या दोघांनाही त्रासदायक आहे,' असं आणखी एकानं आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.