Viral Video: फ्लोरिडामधील एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात डॉक्टर एका व्यक्तीच्या नाकातून जिवंत किडे काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीच्या नाकातून वारंवार रक्त येत असल्याने तो एचसीए फ्लोरिडा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्यावेळी तपासादरम्यान त्याच्या नाकात १५० जिवंत किडे आढळले, हे पाहून डॉक्टरही शॉक झाले.
संबंधित रुग्णाने फर्स्ट कोस्ट न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला माझ्या चेहऱ्याला सूज आली आणि ओठही सुजले. यामुळे मला बोलताही येत नव्हते. मात्र, यानंतर माझ्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली. वारंवार माझ्या नाकातून रक्त येत होते. याशिवाय, मला उठताही येत नव्हते. मला मरणाची भिती वाटू लागली. मला ३० वर्षांपूर्वी न्यूरोब्लास्टोमा झाला, यामुळे माझी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आणि त्याला नाकात कर्करोगाची गाठ झाली होती, असेही त्याने स्पष्ट केले.
या रुग्णाने डॉ. डेव्हिड कार्लसन यांची भेट घेतली असता त्याच्या नाकातील किड्यांचा शोध लागला. डॉ. कार्लसन यांनी फर्स्ट कोस्ट न्यूजला सांगितले की, "सुदैवाने त्याने मला नाकातून होणारा रक्तस्त्राव जवळून पाहण्यास प्रवृत्त केले. यामुळे आम्ही कॅमेऱ्याने नाकाच्या आतील तपासले असता सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या नाकात अनेक किडे होते. हे किडे मलमूत्र तयार करतात. यामुळे विषारी वातावरण तयार होते. ज्यामुळे रुग्णांना त्रास होतो, असेही कार्लसन म्हणाले. युट्यूबवर या व्यक्तीच्या नाकातील जिवंत किड्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला.
फर्स्ट कोस्ट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीला नाक साफ करण्यासाठी खास अँटी-परजीवी वॉश दिला जात आहे. वर्षातून तीन ते चार वेळा त्याचे मूल्यमापन करावे लागणार आहे तो पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या