Pune Crime : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका सोसायटीत एका बड्या आयटी कंपनीच्या संचलकाला बहिष्कृत केल्याची घटना ताजी असतांना आता एका सोसायटीच्या आवारात गाडी धुतल्याप्रकरणी एकाने दुसऱ्या राहिवाशाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट तोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी तक्रार ११ सप्टेंबर रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तन्मय वीरेन भार्गव (वय ३१, रा. श्री गणेश अपार्टमेंट, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी अमोल देवरे (वय ३५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्मय भार्गव हे विमाननगर परिसरातील एका बड्या सोसायटीत राहतात. ते त्यांच्या सोसायटीतील पार्किंगमध्ये त्यांची गाडी धूत होते. यावेळी आरोपी अमोल देवरे याने त्यांना पार्किंगमध्ये कार धुण्यास विरोध केला. त्यावर भार्गव यांनी उत्तर दिले की, तुम्ही गाडी तुमच्या पार्किंगमध्ये धुतली ते चालतं का? यावरून देवरे व भार्गव यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद वाढत गेला. यात देवरे याने भार्गव यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. या मारहाणीत भार्गव यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. आरोपींनी भार्गव यांना शिवीगाळ व मारहाणही केली.
या घटनेनंतर भार्गव हे दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. भार्गव याने या प्रकरणी ११ सप्टेंबररोजी विमानतळ पोलिस ठाणे गाठत देवरे याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ११७ (२), ११५ (२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.