ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ही मुलगी कर्करोगाने ग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमधील मुलीच्या कुटुंबाच्या गावातील रहिवासी आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी बदलापूर येथे त्यांच्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था केली होती. तसेच तो पीडितेला उपचारासाठी मदत करत होता.
मुलगी घरात एकटी असताना आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. तिच्यावर तीन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलीवर मुंबईतील एका रुग्णालयात केमोथेरपी सुरू होती आणि नियमित तपासणी दरम्यान ती गरोदर असल्याचे समजले. या प्रकरणी आरोपींविरोधात पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या उपचारात करत होता मदत -
वरिष्ठ अधिकारी किरण बालवडकर म्हणाले, 'आरोपीने पीडितेच्या कुटुंबाची बदलापूर येथे राहण्याची व्यवस्था केली होती. मुलीच्या उपचारातही तो मदत करत होता. यावेळी त्याने पीडितेवर बलात्कार केला, ज्यामुळे ती गरोदर राहिली. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तपास सुरू आहे.
दरम्यान तेलंगणात चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शासकीय रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ३ एप्रिल रोजी सकाळी २० वर्षीय आरोपीने ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत प्रवास करत होती. ती स्वच्छतागृहात गेली असता आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
संबंधित बातम्या