मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasba Peth : अभिजित बिचुकले म्हणतात, माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा अन् विषय संपवा!

Kasba Peth : अभिजित बिचुकले म्हणतात, माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा अन् विषय संपवा!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 23, 2023 04:45 PM IST

Abhijit Bichukale : अभिजित बिचुकले यांनी कसब्यातील पोटनिवडणूक उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे.

Abhijit Bichukale On Eknath Shinde
Abhijit Bichukale On Eknath Shinde (HT)

Abhijit Bichukale On Eknath Shinde : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभांच्या पोटनिवडणुकीसाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय सभांना चांगलाच जोर आला आहे. भाजप व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांनी कसब्यातून उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराची राळ उडवून दिली आहे. तरुण, महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेत अभिजित बिचुकले यांनी विजयी झाल्यास नागरिकांच्या प्रश्न सोडवणार असल्याचा दावा केला आहे. परंतु आता त्यांनी माझ्या पत्नीला महाराष्ट्राची मुख्यमंत्री करा आणि विषय संपवा, अशी मागणीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पुण्यात एमपीएससीविरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची अभिजित बिचुकलेंनी भेट घेतली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बिचुकले बोलताना म्हणाले की, माझ्या पत्नीला म्हणजे तुमच्या सुनबाईला महाराष्ट्राची मुख्यमंत्री करायला हवं, लेडी मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्रातील अनेक प्रश्न सुटतील, अशी मागणी अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे असल्यानं मला त्यांचा फार अभिमान वाटतो. त्यांनी साताऱ्याचा मान वाढवलेला आहे. फक्त एकनाथ शिंदेच नाही तर मी पण साताऱ्याचाच आहे. एकनाथ शिंदेंनी त्याच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करायला हवं, असंही बिचुकले म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्या पत्नीला मुख्यमंत्री केल्यास सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील. शेतकऱ्यांसह सर्व वर्गातील लोकांचेही प्रश्न सोडवले जातील, असंही अभिजित बिचुकले यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता बिचुकलेंच्या या मागणीवर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अभिजित बिचुकले यांच्या पत्नीचं नाव अलंकृता बिचुकले असं आहे. अलंकृता यांच्या वाढदिवसानिमित्त अभिजित यांनी यांनी पत्र लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीचा उल्लेख भावी महिला मुख्यमंत्री असा केला होता.

WhatsApp channel