मोठी बातमी..! नाशिकमध्ये २३ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू, राज्यात PSI सह तीन जणांचा गळा कापला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी..! नाशिकमध्ये २३ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू, राज्यात PSI सह तीन जणांचा गळा कापला

मोठी बातमी..! नाशिकमध्ये २३ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू, राज्यात PSI सह तीन जणांचा गळा कापला

Jan 14, 2025 06:13 PM IST

Nylon Manja : नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत अनेक जण या माजांमुळेगंभीर जखमी झाले आहेत. आता तर या मांजाने एकाच जीव घेतल्याची घटना नाशिकमधून समोर आली आहे.

तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू
तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू

Throat Cut with Nylon Manja : नायलॉन मांजावर (nylon manja) बंदी घालण्यात आली असली तरी देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. मात्र,हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत अनेक जण या माजांमुळे गंभीर जखमी झाले आहेत. आता तर या मांजाने एकाच जीव घेतल्याची घटना नाशिकमधून समोर आली आहे. नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापला गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) पाथर्डी फाटा परिसरात घडली. सोनू किसन धोत्रे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.

संपूर्ण देशभरात मकरसंक्रांतीच्या सणाचा उत्साह असताना नायलॉन मांजामुळे धोत्रे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सोनू आज देवळाली गावातून आपल्या बहिणीला घेण्यासाठी पाथर्डी फाटा परिसरातदुचाकीने जात होता. त्यावेळी नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकून गळा चिरला गेला. गंभीर जखमी अवस्थेत त्यालानाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्य़ात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सोनूचे लग्न ठरले होते व १३ मे महिन्यात त्याचे लग्न होणार होते. सोनू वाहन चालक व्यवसायासाठी गुजरातमधील वलसाड येथे स्थायिक झाला होता. आज संक्रांतीनिमित्त व लग्न ठरवण्यासाठी नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे आला होता. त्यांच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरात पीएसआयचा गळा कापला -

संभाजीनगरात एका पोलीस अधिकाऱ्याचा नायलॉन मांजाने गळा कापला आहे. कर्तव्यावर निघालेल्या पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे. सचिन पारधे असे जखमी पीएसआयचे नाव असून ते स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले असता ही घटना घडली.

लाखनीत तरुण जखमी -

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील उड्डाणपुलावर एका २४ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला. तरुण भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने दुचाकीने जात होता. शुभम जियालाल चौधरी (रा. गोरेगाव, जि. गोंदिया) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शुभम भंडाराकडून गोंदियाकडे जात असताना लाखनी उड्डाणपुलावर कटलेला पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापला गेला. यात तरुण गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला भंडाराच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

नाशिकमध्ये तरुणाला ४५ टाके -

दरम्यान नाशिकमध्ये आणखी एक नायलॉन मांजाने गळा कापल्याची घटना समोर आली आहे. पारेगाव रोडने बाईकवरून घरी जाणाऱ्या दत्तू जेजुरकर या तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजाने गंभीर जखम झाली असून त्याला एकूण ४५ टाके टाकण्यात आले आहे. येवल्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या