राज्यासह देशभरात आज मकर संक्रातीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त पंतग उडवण्याचीही लगबग सुरू आहे. मात्र पतंगासाठी वापरण्यात येणारा चिनी नायलॉन मांजा पक्षी, प्राण्यांसोबत नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नायलॉन मांजाने जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढहोत असतानाच मुंबईच्या बोरीवली भागात मांजाने गळा कापून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकमध्येही नायलॉन मांजाने गळा कापण्याच्या दोन घडल्या आहेत.
मुंबईच्या बोरीवली परिसरात दुचाकीवरून जाताना २१ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेला. यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाण पुलावर ही घटना घडली. मोहम्मद शेख फारुकी (वय २१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मोहम्मद शेख दुचाकीवरुन जात असताना कोरा केंद्र उड्डाण परिसरात त्याचा पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा कापला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात पतंग उडवणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दोन जण नायलॉन मांजाने गळा चिरून जखमी झाले आहेत. सिन्नरमध्य एक जण दुचाकीवरुन जात असताना पतंगाच्या मांजाने गळा कापला गेल्याने जखमी झाला. उत्तम विष्णू आव्हाड (वय ४९ रा. वडझिरे, ता. सिन्नर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. उत्तम आव्हाड आपल्या पत्नीसह मोटारसायकलने वावी वेसकडून संगमनेर नाक्याकडे जात होते. यावेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकल्याने त्यांचा गळा कापला. हाताला जखम झाली. त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत नीरज सुमीत राठोड (वय ३०, रा. कळवण) हा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. तो कळवण येथून येवल्यातील रेल्वे स्टेशनकडे जात होता. त्यांच्या गळ्याला आठ टाके पडले आहेत. त्यांच्यावर येवला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या