Four Maoists Died in Encounter : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात देखील पाच टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभमीवर नक्षलवादी घातपात करणार असल्याची शक्यता होती. मात्र, त्या पूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ३६ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. कमांडो आणि माओवादी यांच्यात आज सकाळी ही चकमक झाली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी तेलंगणाच्या सीमेतून महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झालेल्या माओवाद्यांना चारही बाजूने घेराव घालून ठार मारण्यात आले आहे. कोलामार्काच्या जंगलात सी ६० कमांडो पथकांनी ही कारवाई केली.
ठार मारण्यात आलेल्या चार नक्षलवाद्यांपैकी दोन प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या पॉलिट ब्युरोच्या विभागीय समितीचे सदस्य होते. त्यांच्यावर प्रत्येकी १६ लाख रुपयांचे बक्षीस होते. कोलामार्का पर्वतांमध्ये राज्य पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, त्यांना सोमवारी दुपारी तेलंगणा येथून महाराष्ट्रात चार नक्षलवादी येणार असल्याची माहीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. हे नक्षलवादी लोकसभा निवडणुकी दरम्यान, घातपात करणार होते. या माहितीच्या आधारे ताबडतोब सी ६० कमांडोचे पथक हे जंगलामध्ये पाठवण्यात आले होते. पोलिस नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना रेपनपल्लीजवळील कोलामार्का पर्वतावर हे चार नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यांनी डोंगरावर घेराव घातला. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार गोळीबार केला. यावेळी, त्यांना कमांडोने जोरदार प्रत्युत्तर दिले. मंगळवारी पहाटे माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दोन तासांहून अधिक काळ चकमक झाली. यात चार नक्षलवादी ठार झाले.
गोळीबार थांबल्यानंतर कमांडो पथकाने परिसराची झडती घेतल्यानंतर, घटनास्थळावरून एक एके-47, एक कार्बाइन, दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सीपीआय (माओवादी) साहित्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळासह चार मृतदेह सापडले. चकमकीनंतर काही जखमी अतिरेकी या भागातून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा जिल्हा पोलिसांना संशय आहे. नावे वर्गेश, मगटू, सीपीआय (माओवादी) च्या वेगवेगळ्या विभागीय समित्यांचे दोन्ही सचिव आणि पलटण सदस्य कुर्संग राजू आणि कुडिमेट्टा व्यंकटेश अशी नक्षलवाद्यांची नावे आहेत.
या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.
संबंधित बातम्या