Pune Traffic Update : पुण्यात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने येथील कामे लवकर करण्यासाठी औंध, गणेश खिंड आणि शिवाजी नगर मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बादलानुसार सर्व प्रकारची मालवाहतूक, खासगी प्रवासी बसेस, पीएमपीएल बसेसला ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. आंबेडकर चौकातून जावे लागेल. तर, दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना एबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंजहिल्स मार्गे जावे लागणार आहे.
पुण्यात मेट्रोची कामे सुरू आहे. सध्या पुणे विद्यापीठ मार्ग आणि गणेशखिंड चौकात वेगाने मेट्रोची कामे सुरू आहे. या कामासाठी गणेश खिंड मार्गावर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यापीठ रस्त्याने शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना औंध पासून ते एबिल हाऊस ते सिमला ऑफिस चौक हा पूर्ण मार्ग बंद राहणार आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो उभारण्याचे काम सुरू आहे. टाटा कंपनी हे काम करत आहे. दरम्यान, या मार्गावरची आचार्य आनंद ऋषींजी चौक (विद्यापीठ चौक), आरबीआय, कृषी महाविद्यालय, सिमला ऑफिस आणि शिवाजीनगर कोर्ट या पाच मेट्रो स्थांनकांचे काम एकाचवेळी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढील काही दिवस या मार्गावरची वाहतूक ही बदलण्यात आली आहे.
पुणे वाहतूक पोलिसांनी केलेले या मार्गावरील बदल हे १ जूनपासून लागू होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. यावेळी वाहतूक उपयुक्त रोहिदास पवार देखील उपस्थित होते.
औंध रोडवरील ब्रेमेन चौकामधुन पुणे विद्यापीठ चौकामध्ये येण्यासाठी फक्त दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून ही वाहने विद्यापीठाच्या आतील रस्त्याने व्हॅमनीकॉमचे मुख्य प्रवेशद्वारातुन गणेशखिंड रोडवर जातील. पीएमपी बस व इतर जड वाहनांना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून (औंध रस्ता) जयकर पथावरुन आंबेडकर चौक साई चौक सिंफनी चौक (रेंजहिल) येथून कृषी महाविद्यालयाकडील रस्त्याने न. ता. वाडीकडे जावे लागणार आहे.
पुणे स्टेशन, नगररोड कडे जाणा-या वाहनांनी ब्रेमेन चौक येथून डॉ. आंबेडकर चौक बोपोडी चौकमार्गे मुंबई पुणे रस्त्यावर जावे. हिंजवडी - सांगवी परिसरामधुन येऊन सेनापती बापट रोडवर जाणा-या पीएमपीएल बसेस ऋषी मल्होत्रा चौकामधून उजवीकडे वळण घेवुन परिहार चौकातून डावीकडे वळण घेवुन बाणेर रोडवरुन विद्यापीठ चौक मार्गे जातील.
मेट्रो स्टेशन आर. बी. आय. स्थानक येथील गर्डर उभारण्यासाठी विद्यापीठ चौकामधुन रेंजहिल्स चौकापासुन पुढे शिवाजीनगरकडे येण्यासाठी गणेशखिंड मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनधारकांना रेंज हिल्स कॉर्नर येथून जावे लागणार आहे. तर, सिमला ऑफिस चौकामधुन सीओईपी हॉस्टेलच्या बाजुने स.गो. बर्वे चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी संचेती हॉस्पीटल समोरुन उजवीकडे वळण घेवुन स.गो. बर्वे चौक येथे जाता येणार आहे. संचेती हॉस्पिटल समोरील अंडरपास दररोज रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात आला आहे.
पुणे मुंबई महामार्गावरील पोल्ट्री फार्म चौकामधुन रेल्वे अंडरपासमार्गे रेंजहिल्सकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विद्यापीठ, औंध, बाणेरकडून येणारी वाहने रेंजहिल्स मार्गे पोल्ट्री फार्म चौकातून पुढे जातील. हे सर्व बदल लक्षात घेऊन तसे मार्गक्रमण करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे.
संबंधित बातम्या