Mahim Vidhan Sabha Constituency : सत्ता आल्यास मशिदींवरील भोंगे हटवणार असं वक्तव्य करणारे मनसेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘अमित ठाकरे हे बालिश आहेत. ते काहीही बोलू शकतात,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी माहीम हा एक मतदारसंघ आहे. इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत, शिंदेंच्या सेनेचे सदा सरवणकर आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तिन्ही उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
महायुतीचे सरवणकर यांनी माघार न घेतल्यामुळं आता राज ठाकरे हे स्वत: अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत. नुकतीच मतदारसंघात त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासही हात घातला. आमची सत्ता आल्यास मशिदीवरचे भोंगे काढून टाकू असं ते म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांना मीडियाच्या प्रतिनिधींनी या भूमिकेबाबत विचारलं असता राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही, असं ते म्हणाले. मात्र अमित ठाकरे हे देखील भोंगे काढण्याची भाषा करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी एकेरी शब्दांत बेधडक टीका केली.
‘अमित ठाकरे हा बालिश आहे. तो काहीही बोलू शकतो, त्याला राजकारणातलं काय कळतं, असा प्रतिप्रश्न सावंत यांनी मीडियाला केला. मी १२ वर्षांपासून राजकारणात आहे या अमित ठाकरेंच्या वक्तव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. ‘१२ वर्षांचं काय घेऊन बसलात, आम्ही म्हणतो तो जन्मापासून राजकारणात आहे. कारण त्याचा जन्मच राजकीय घरात झाला. पण नुसता जन्म होऊन काय होतं? सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. त्याचा मुलगा झाला का देव? अशी अनेक उदाहरणं आहेत,’ असा टोला सावंत यांनी हाणला.
अमित ठाकरे यांच्या रूपानं आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातील दुसरा व्यक्ती थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरला आहे. अमित यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व महायुती उमेदवार देणार नाही अशी एक चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. ज्या दादरमध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तिथं पक्ष उमेदवार देणार नाही असं होणारच नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं घेत उमेदवार दिला व सरवणकर यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही.