Mahim : माहीममध्ये भाजप कोणाचा प्रचार करणार? नारायण राणे यांनी बेधडक सांगून टाकलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahim : माहीममध्ये भाजप कोणाचा प्रचार करणार? नारायण राणे यांनी बेधडक सांगून टाकलं!

Mahim : माहीममध्ये भाजप कोणाचा प्रचार करणार? नारायण राणे यांनी बेधडक सांगून टाकलं!

Nov 04, 2024 07:37 PM IST

Narayan Rane on Sada Sarvankar : माहीम विधानसभा मतदारसंघात कोणाचा प्रचार करणार या प्रश्नावर नारायण राणे यांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलं आहे.

सरवणकर-ठाकरे वादात भाजपची नेमकी भूमिका काय? नारायण राणेंनी संभ्रम वाढवला
सरवणकर-ठाकरे वादात भाजपची नेमकी भूमिका काय? नारायण राणेंनी संभ्रम वाढवला

Sada Sarvankar vs Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी माघार न घेतल्यामुळं माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत भाजप कुणाच्या बाजूनं राहणार याचं स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेलं नाही. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेमुळं याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचा नेमका कोणाचा प्रचार करणार या प्रश्नावर त्यांनी थेट सदा सरवणकर यांचं नाव घेतलं. महायुतीचा उमेदवार कोण आहे? सदा सरवणकर! मग आम्ही त्यांचाच प्रचार करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकाळी इकडे आणि संध्याकाळी तिकडे असे नाही. आमचा जॉब परमानंट आहे, असं राणे म्हणाले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून माहीम हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळं भाजप आता माहीममध्ये मदत करेल असं बोललं जात होतं. मात्र, महायुतीकडून शिंदे गटानं सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलं आहे.

सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न झाले. मात्र त्यांनी सुरुवातीपासून माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं भाजपच्या काही नेते व आमदारांनी आम्ही अमित ठाकरे यांचा प्रचार करणार असं जाहीरही केलं होतं. सरवणकर यांच्यावर माघारीसाठी दबाव वाढवण्याची ही खेळी होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळं महायुती म्हणून भाजपला सरवणकर यांचाच प्रचार करावा लागणार आहे. नारायण राणे यांच्या आजच्या वक्तव्यामुळं हे स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे यांनी सरवणकरांची भेट नाकारली!

निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज यांनी सरवणकरांना भेट नाकारली. त्यामुळं आता शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. 

माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत रिंगणात आहेत. सावंत हे कडवट आणि आक्रमक शिवसैनिक आहेत. मनसे आणि शिंदे गटाच्या वादात न पडता त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यामुळं या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार याकडं लक्ष लागलं आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर