Maharashtra Election Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सत्ताधारी महायुती पुन्हा एकदा निर्विवाद विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.
कोथरूडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे हे पुन्हा महायुतीच्या सोबत आल्यास तुमची काय भूमिका असेल असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, 'उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अर्थात, आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. काही अपक्षांची साथही मिळणार आहे. अशा परिस्थिती महायुतीकडून उद्धवजींना आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वत: पुढाकार घेतल्यास भाजपचे वरिष्ठ नेते यावर विचार करतील, असं पाटील म्हणाले.
‘२०१९ ला लोकांनी युतीला कौल दिला असताना त्यांनी वेगळी वाट पकडली. त्यावेळी अनेकांना वाईट वाटलं. आम्हालाही व्यक्तिश: वाईट वाटलं होतं. त्यावेळी तसं काही झालं नसतं तर आता यापेक्षाही चांगला निकाल शिवसेना-भाजपच्या बाजूनं लागला असता,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना मोठी आघाडी मिळाली आहे. त्याबद्दल त्यांनी तिथल्या मतदारांचे आभार मानले आहेत. 'गेल्या पाच वर्षांपासून मी मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुखदु:खाशी समरस झालो होतो. त्यामुळं या निकालात मला आश्चर्य वाटत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीची विधानसभा निवडणुकीच्या निकालात सरशी झाल्याचं चित्र आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत महायुतीनं २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. हे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता नसल्यामुळं महायुती राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. अर्थात, कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार हे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.