Maharashtra assembly election 2024 survey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. झारखंड आणि इतर पोटनिवडणुकांसह महाराष्ट्राचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आहे. दरम्यान, राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार या बाबत एक सर्व्हे समोर आला आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते.
आयएएनएसने मैटराइजसंदर्भात महाराष्ट्रात नेमके कुणाचे सरकार येणार या बाबत सर्वेक्षण केले असून याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे आहे. या सर्वेक्षणात प्रदेशनिहाय माहिती देण्यात आली आहे. या सर्व्हेत महायुतीने बाजी मारली आहे. या सर्वे नुसार महायुतीला १४५ ते १६५ तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात बहुमताचा आकडा १४५ आहे. म्हणजेच महाराष्ट्रात महायुतीचे पुढचे सरकार स्थापन होऊ शकते.
पश्चिम महाराष्ट्रात ७० जागांपैकी महायुतीला ३१ ते ३८ जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला ४० टक्के मतांसह २९ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात महायुतीला ६२ पैकी ३२ ते ३७, महाविकास आघाडीला २१ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील एकूण ४६ जागांपैकी महायुतीला ४७ टक्के मतांसह १८ ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय महाविकास आघाडीला ४४ टक्के मतांसह २० ते २४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. ठाणे-कोकणात महायुतीला २३ ते २५, महाविकास आघाडीला १० ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईत एकूण ३६ जागा असून त्यापैकी महायुतीला ४७ टक्के मतांसह २१ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मतांसह १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात ३५ जागांपैकी महायुतीला १४ ते १६ तर महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे एकूण २८८ जागांपैकी महायुती ४७ टक्के मतांसह १४५ ते १६५ जागा, महाविकास आघाडी ४१ टक्के मतांसह १०६ - १२६ जागा जिंकू शकते. १२ टक्के मते मिळाल्यास इतर शून्य ते पाच जागांवर जाऊ शकतात. महाराष्ट्रात महायुतीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) असे पक्ष आहेत.