Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं कारण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं कारण काय?

Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं कारण काय?

Nov 29, 2024 03:53 PM IST

Mahayuti meeting cancelled: राज्यात सत्ता स्थापनेचा पेच असताना मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द करण्यात आली असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी रवाना झाले आहेत.

मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द
मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द (Maharashtra CMO)

Maharashtra Politics: राज्यात सत्ता स्थापनेचा पेच असताना मुंबईतील (Mumbai) महायुतीची (Mahayuti) बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मूळगावी साताऱ्याला (Satara) रवाना झाले आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.  मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांचे वाटपाबाबत सर्व काही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत आज महायुतीची बैठक होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आली. महायुतीचा शपथविधी सोहळा २ डिसेंबर रोजी पार पडण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या सातारा गावाकडे रवाना झाले आहेत. शिंदे परतल्यानंतर आता ही बैठक होणार आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या सर्व भेटी रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सत्तास्थापनेबाबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे साताऱ्यातील महाबळेश्वरजवळील दारा या मूळगावी गेले आहेत. 

लवकरच मुख्यमंत्रीबाबत घोषणा

याआधी स्वत: एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजप कोणालाही मुख्यमंत्री बनवेल, त्याला हरकत नाही, असे सांगितले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित झाले. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीत सर्वकाही ठिक असल्याचे सांगितले. मुंबईतील बैठकीनंतर राज्यातील पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल, असेही ते म्हणाले होते.
 

शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नकारली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला असला तरी काही मंत्रिपदांची चर्चा रखडल्याचे दिसत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला कायम राहण्याची शक्यता आहे. पण नव्या सरकारमध्ये स्वत: एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्यात रस नाही. शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे योग्य नाही. शिंदे यांच्या जागी शिवसेनेत इतर कुणाला संधी दिली जाईल, असे ते म्हणाले.

कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे?

नव्या सरकारमध्ये भाजप गृहमंत्रालय स्वत:कडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे अर्थमंत्रिपद दिले जाण्याची चर्चा आहे. सरकारमध्ये भाजपला २२, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादीला ९ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. २८८ जागांच्या विधानसभेत महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. यात एकट्या भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४२ जागा मिळाल्या आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर