MVA Seat Sharing Formula : विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांचा वाद मिटवून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरुच आहे. युती व आघाडीमध्ये जवळपास ९० टक्के जागावाटप झाले असून उमेदवारही निश्चित झाले आहेत. शिल्लक जागांबाबत दिल्लीत बैठका सुरू आहेत. महाआघाडीतील ठाकरे गट व काँग्रेसमधील वाद दिल्ली दरबारी गेला आहे. महाआघाडीने आधीचा ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला आता बदलला आहे. मविआचा नवा फॉर्म्युला ९०-९०-९० झाला असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत सांगितले. (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जागावाटपाच्या चर्चासाठी नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना १८ जागा दिल्याचे तसेच प्रमुख तीन पक्षांचा फॉर्म्युला ८५ वरून ९० झाल्याचं त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, महाविकास आघाडी कुठल्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करणार नाही. काही अडचणी आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मित्रपक्षांसाठी १८ जागा बाजुला ठेवलेल्या आहेत. त्यातूनही किती सुटतात ते पाहत आहोत. आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला वाढून आता ९० वर गेला आहे. काँग्रेस १०० च्या पुढे जाऊ शकते का, याची बेरीज अद्याप केलेली नाही असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, सर्वच जागांवर सीईसी बैठकीत शिक्कामोर्तब होईलय अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. आज राज्यातील ५५ जागांवर चर्चा झाली आहे. मैत्रीपूर्ण लढतींबाबत अद्याप निर्णय घेतला नाही.
काँग्रेसन काल ४८ जागांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांना व प्रस्तापितांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने ४५ तर उद्धव ठाकरे गटाने ६५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत १५८ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या दुसऱ्या उमेदवार याद्या आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या