‘बोरिवली काही धर्मशाळा नाही, जिथे..’; स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणारच; गोपाळ शेट्टींनी भाजपला सुनावले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘बोरिवली काही धर्मशाळा नाही, जिथे..’; स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणारच; गोपाळ शेट्टींनी भाजपला सुनावले

‘बोरिवली काही धर्मशाळा नाही, जिथे..’; स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणारच; गोपाळ शेट्टींनी भाजपला सुनावले

Oct 29, 2024 12:23 AM IST

Borivali Assembly Constituency : बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी मी अपक्ष लढणार आहे. उद्या सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.

गोपाळ शेट्टी यांच्याकडून बंडखोरीचे संकेत
गोपाळ शेट्टी यांच्याकडून बंडखोरीचे संकेत

Gopal Shetty rebellion against bjp : बोरिवलीची जागा महायुतीत कोणाला जाणार याचा सस्पेन्स सोमवारी संपला असला तरी भाजपसमोर आता बंडखोरीचे मोठे संकट उभे राहिले आहे. पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवार आयात करण्यात आला असून यंदा विलेपार्लेतील भाजपचे नेते संजय उपाध्याय यांना बोरिवलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला आहे. यानंतर गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी मी अपक्ष लढणार आहे. उद्या सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे.

मी पक्षाशी अजूनही एकनिष्ठ असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी बोरिवली विधानसभा लढवणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्षाने तिसऱ्यांदा या मतदारसंघासाठी उमेदवार आयात केला आहे. यामुळे शेट्टी समर्थक नाराज झाले आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

गोपाळ शेट्टी यांनी म्हटले की, म्हणाले की, बोरिवली काही धर्मशाळा नाही. संविधानानुसार नगरसेवक, विधानसभा आणि लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यानुसार कोणी कुठूही लढू शकतो. मात्र परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे. आधी विनोद तावडेंना आणलं,  त्यानंतर सुनील राणेंना आणले मी खासदार होतो लोकांनी चालवून घेतले. 

त्यानंतर लोकसभेला मला बदलून पीयूष गोयल यांना आणलं. तरीही मी गोयल यांच्या पाठीशी होतो. मात्र आताही तेच झाले आहे. संजय उपाध्याय चांगले कार्यकर्ते आहेत व त्यांनी पक्षासाठी काम केलंय हे कोणीही नाकारत नाही, मात्र बोरिवली मतदारसंघात वारंवार अशाप्रकारे खेळ करणे बरोबर नाही.

शेट्टी म्हटले की, मी बोरिवलीचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. मला सध्या लोकांची भावना जाणवते, की तुम्ही जर आता लढले नाही तर येणाऱ्या ५० वर्षात कुणीही लढणार नाही. पुढील ५० वर्ष बोरिवलीचा अशाप्रकारे वापर केला जाईल. ज्या बोरिवलीने मला पुढे आणले त्या लोकांसाठी जे काही करणे मला शक्य आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. ज्यानंतर बोरिवलीचे भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांनी त्यांची भेट घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गोपाळ शेट्टी काय निर्णय घेतात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या