H5N1 Bird flu in Nagpur Zoo: नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात एच५एन१ एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राने महाराष्ट्रातील प्राणिसंग्रहालये आणि वन्यजीव बचाव केंद्रांना राज्यव्यापी सूचना जारी केल्या आहेत. यात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्राणी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची रूपरेषा आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या घटनेतील तीन वाघ आणि एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला.प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतनिक भागवत यांनी सांगितले की, या प्राण्यांमध्ये जुलाब, उलट्या, डोळ्यांतून पाणी येणे, छातीत इन्फेक्शन आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. केंद्रातील उर्वरित १२ वाघ आणि २४ बिबटे सुरक्षित आहेत. तसेच, ‘शेजारच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयावर त्याचा परिणाम झालेला नाही. पर्यटकांना विनासंकोच भेट देता येईल’, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
भोपाळमधील आयसीएआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजने ३ जानेवारी रोजी जनावरांच्या नमुन्यांमध्ये एच५एन१ संसर्गाची पुष्टी केली. एव्हियन इन्फ्लूएंझा प्रामुख्याने पक्ष्यांवर परिणाम करत असला तरी एच५एन१ आणि एच५एन९ सारखे स्ट्रेन संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाद्वारे प्राण्यांना संक्रमित करतात. या आंतरप्रजातीच्या संसर्गामुळे जागतिक चिंता वाढली आहे. केंद्राने अतिरिक्त २६ बिबटे आणि १२ वाघांची तपासणी केली असून हे सर्व जण निरोगी आढळले आहेत. केवळ पशुवैद्यकांसाठी उपलब्ध असलेला कंटेनमेंट झोन स्थापन करण्यात आला असून निर्जंतुकीकरणाचे नियम लागू करण्यात आले आहेत. नसबंदीसाठी फायर ब्लोअरचा वापर केला जात आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने रेड अलर्ट जारी केला असून जैवसुरक्षा उपाययोजना आणि एकात्मिक रोग व्यवस्थापनावर भर देत शेजारच्या राज्यांना सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या