Womens Policy : नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा मान अजित पवारांना, शिंदे-फडणवीसांनीही बदलली नावाची पाटी-maharashtra womens policy ajit pawar has changed his name plate for implementation womens policy ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Womens Policy : नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा मान अजित पवारांना, शिंदे-फडणवीसांनीही बदलली नावाची पाटी

Womens Policy : नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा मान अजित पवारांना, शिंदे-फडणवीसांनीही बदलली नावाची पाटी

Mar 11, 2024 10:19 PM IST

Maharashtra womens policy : जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारनं राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणलं. या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्यांदा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बदलल्या नावाच्या पाट्या
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बदलल्या नावाच्या पाट्या

महाराष्ट्र सरकारने यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने (८ मार्च रोजी) राज्याचं चौथं महिला धोरण जाहीर केलं होतं. यानुसार शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही मंजुरी देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्यांदा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी आज झळकली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारनं राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणलं.  यात महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसोबतच अष्टसूत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणे, लिंग समानता, पूरक रोजगार, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होणार असून महिला अधिक स्वावलंबी होतील असा विश्वास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 

या धोरणानुसार सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. अजित पवार यांनी आपल्या नावाची पाटी बदलली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल, कृतीशील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 

८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आलं. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. ८ मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी,  उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची  'अजित आशाताई अनंतराव पवार' ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली.

याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नावाद बदल करत असल्याची घोषणा केली होती. यापुढे फडणवीसांच्या नावात आईचं नावही वडिलांच्या नावासोबत लागणार आहे.  यापुढे माझ नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं असेल असं फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला आनंद होतोय की, मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची आज सुरुवात झाली असून आता वडिलांच्या नावासोबत आईचे नाव जोडले जाणार आहे. हे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे लागू करण्यात आले.