Maharashtra Politics : “एकनाथ शिंदेंना आजारी दाखवून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली, येत्या २-३ दिवसांत..”
MaharashtraPolitics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या अफवांचे अजित पवार यांनी खंडन केले असले तरी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत केलेल्या विधानाने याच्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'येत्या दोन-तीन दिवसात राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असं भाकीत आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर भाष्य केले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपच्या हालचाली सुरू असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळेच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदे आजारी असल्याचे सांगून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुण्यात शरद पवार व अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या खरा मुख्यमंत्री कोण हा संभ्रम आहे. येत्या दोन तीन दिवसात खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल.
पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘सामना’त जे आले, ती पक्षाची भूमिका आहे. संजय राऊत यांनी जे मांडलं, तीच आमची भूमिका आहे'.