Maharashtra Rains: महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर, काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, येत्या २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
गणपती विसर्जनानंतर राज्यातील काही भागांत पाऊस पुन्हा हजेरी लावेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील बहुंताश भागांत पावसाच्या सरी कोसळतील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे आणि बीड येथे पावसाची शक्यता आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील वातावरण सध्या थंड आहे. दिल्लीत मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचला असून धुक्यांनी पसरायला सुरुवात केली आहे.आज दिल्लीत राष्ट्रीय राजधानीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मंगळवारी किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. दिवसा प्रामुख्याने ढगाळ वातावरण होते आणि आधूनमधून हलक्या पााऊसाच्या सरी कोसळत आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिल्लीसाठी यलो अलर्ट जारी केला होता.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत राजधानी दिल्लीत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीतील हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इन्डेक्स सकाळी ९ वाजता १६७३ नोंदवला गेला, जो मध्यम श्रेणीत येतो. शून्य ते ५० मधील एक्यूआय चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अत्यंत खराब आणि ४०१ ते ५०० गंभीर मानले जाते.
पश्चिम बंगालमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘यागी’ वादळाचा परिणाम आता उत्तर प्रदेशच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस म्हणजे ४८ तास राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.