Maharashtra Rain: मुंबई, ठाणेसह 'या' भागांत धो-धो पाऊस; नदी- नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain: मुंबई, ठाणेसह 'या' भागांत धो-धो पाऊस; नदी- नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत!

Maharashtra Rain: मुंबई, ठाणेसह 'या' भागांत धो-धो पाऊस; नदी- नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत!

Jul 07, 2024 07:21 PM IST

Maharashtra Rain Updates: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू (HT)

Maharashtra Rain News: राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, शहापूर येथील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी, सखल भागांत पाणी साचले आहे. काही भागांत नद्या- नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जोरदार हजेरी लावली.

शहापूर तालुक्यात जनजीवन विस्कळीत

ठाण्यातील शहापूर तालुक्याला रात्रीपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. शहापूर शहरातील अनेक घरांमध्ये भारंगी नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जीवरक्षक दलाचे जवान पावसामुळे अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य रेल्वेच्या कसारा ते खराडी दरम्यानच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकावर पावसाचे पाणी साचल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

मुसळधार पावसाचा मुंबई लोकलच्या सेवेवर परिणाम

मुसळधार पावसामुळे मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील लोकल सेवा रविवारी सकाळी बंद करण्यात आली. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने किंवा शॉर्ट टर्मिनेशनमुळे रेल्वे सेवेवर परिणाम होत आहे. मुसळधार पावसामुळे आटगाव ते ठाणसित स्थानकांदरम्यान माती असल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रुळ असुरक्षित असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास जाहीर केले. याचबरोबर वाशिंद स्थानकाजवळ झाड कोसळून रेल्वे वाहतूक बंद झाली.

मुंबईतील तापमान

मुंबई आणि आसपासच्या भागात गेल्या महिन्यापासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी शहरात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात ८ आणि ९ जुलै रोजी हलका आणि १० जुलै रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज किमान तापमान २६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर