Maharashtra Weather Updates Today: राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडले, असा इशारा हवामान विभागाने दिला. तर, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकणातील अलिबाग येथे राज्यातील उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामान आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे विदर्भाच्या कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली. तर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलका पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेईल, असेही सांगितले जात आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आयएमडीने म्हटले आहे की, गुरुवारी भरूच आणि सुरतमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बनासकांठा, नवसारी, वलसाड, कच्छ आणि दमण दादरा नगर हवेलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. संततधार पावसामुळे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणासह धरणे आणि जलाशय जवळ किंवा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके बाधित भागात बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
पश्चिम-मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर डीप डिप्रेशनमध्ये होणार असून ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये १२ सप्टेंबर पर्यंत रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. झारखंडच्या दक्षिण भागात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.