Weather News: महाराष्ट्राच्या हवामानात गेल्या तीन- चार दिवसांपासून मोठा बदल पाहायला मिळाला. अनेक भागांत ढगाळ वातावरण असून काही भागांत वादळी पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, उद्यापासून पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.
हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. राज्यात विदर्भातील बुलढाणा, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात आज (७ डिसेंबर २०२४) अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मात्र, उद्यापासून (८ डिसेंबर २०२४) राज्यातील हवामान कोरडे होईल आणि थंडीला सुरुवात होईल. तर, ९ डिसेंबरपासून थंडीची तीव्रता वाढेल. उद्यापासून येत्या १५ डिसेंबरपर्यंत राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस पडेल, असे अंदाज आहे.
संबंधित बातम्या