Weather Updates: राज्यात १४ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी, त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल होणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यात १४ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी, त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल होणार!

Weather Updates: राज्यात १४ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी, त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल होणार!

Dec 11, 2024 09:13 AM IST

Weather News: महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढणार
राज्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढणार (HT)

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. काही भागांत थंडी तर काही ठिकाणी अजूनही उकाडा जाणवत आहे. अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच राज्यात आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि आपल्या शेतीची कामांचे नियोजन करावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात येत्या १४ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यात आता उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात थंडीचा जोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक थंडी उत्तर महाराष्ट्रात जाणवेल. याशिवाय, मराठवाडा आणि विदर्भातील घाटाखाली सुद्धा थंडीची तीव्रता अधिक असेल. महत्त्वाचे म्हणजे, राज्यात १५ डिसेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरनंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार, असा अंदाज हवामान पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.

मुंबईतील वातावरण कसे असणार?

आज (११ डिसेंबर २०२४) मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके असणार आहे. मुंबईतील तापमानात दोन दिवसांपासून घट झाल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना सावधानीचा इशारा

महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याने कांदा आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्याचे हवामान हे पोषक राहणार आहे. मात्र, या हवामानामुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मंगळवारी सकाळपर्यंत नोंदवण्यात आलेले तापमान

पुणे- ३०.१ (१२.३), अहिल्यानगर- २८.२ (११.७), धुळे- २७ (४), जळगाव- २९.४ (८), जेऊर- ३३ (१२.५), कोल्हापूर- ३१.५ (१९.१), महाबळेश्वर- २७.१ (१३.२), मालेगाव- २५.४ (१६.८), नाशिक- २६.५ (९.४), निफाड- २५.९ (८.९), सांगली- ३२.७ (१८.१), सातारा- ३१.७ (१५.८), सोलापूर- ३३ (१९.१), सांताक्रूझ- ३१.८ (१८.०), डहाणू- २९.१ (१४.१), रत्नागिरी- ३१.८ (१८), छत्रपती संभाजीनगर- २९.४ (१२.२), धाराशिव- (१६.३), परभणी- ३०.२ (१२.५), परभणी कृषी विद्यापीठ- २९.५ (१२.९), अकोला- ३०.५ (११.८), अमरावती- ३०.२ (१२.३), भंडारा- २९.८ (१३), बुलडाणा- २५.६ (११.४), ब्रह्मपुरी- ३० (१३.८), चंद्रपूर- २९.८ (१२.५), गडचिरोली- ३० (१३), गोंदिया- २९ (१२.२), नागपूर- ३०.२ (१२), वर्धा- ३०.२ (१२.४), वाशीम- ३२.६ (१९.६), यवतमाळ- ३१ (-).

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर