Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर तापमानात मोठी वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच अवकाळी पावसाचे संकट देखील राज्यावर घोंगावत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यातील घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील हवामानात आमूलाग्र बदल झाला आहे. डिसेंबर महिन्यात मे महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईचया तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या १६ वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईचे तापमान हे ३७ डिग्रीसेल्सिअसपर्यंत गेले आहे. राज्याच्या तापमानात ३ ते ६ डिग्रीने वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच राज्यात पावसाची शक्यता आहे. गुरुवारी काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धारशिव काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. त्यामुळे कडक्याची थंडी पाडण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
उत्तर भारतातील हवामान पुन्हा एकदा बिघडणार आहे. मैदानी आणि डोंगराळ भागासाठी ८ डिसेंबरला नवीन पश्चिमी विक्षोभ दाखल होणार असून, त्यामुळे हवामानात बदल होणार आहे. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासात तामिळनाडूत मुसळधार पाऊस झाला. तर मेघालयमध्ये दाट धुके पाहायला मिळाले.
८ डिसेंबरपासून पश्चिम विक्षोभामुळे डोंगराळ आणि मैदानी भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि पावसालाही कहराला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे अडचणी वाढू शकतात. पंजाब, हरयाणामध्ये ८ आणि ९ डिसेंबरला पाऊस पडेल. याशिवाय पंजाब, हरयाणा, चंदीगडमध्ये ७ ते १० डिसेंबर दरम्यान दाट धुके असेल.
वायव्य भारतात किमान तापमान १० ते १५ अंशांच्या दरम्यान आहे, तर कमाल तापमान १५ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. मध्य भारत, गुजरात, महाराष्ट्र आणि पूर्व भारतात तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. हरयाणातील हिसार येथे मैदानी भागात सर्वात कमी ६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
वायव्य भारतात थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होणार आहे. त्यानंतर फारसा बदल होणार नाही. तर पूर्व भारतात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात दोन अंशांची घसरण होणार आहे. मध्य भारतात पुढील पाच दिवस कोणताही मोठा बदल दिसणार नाही.
हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात बुधवारी दिवसभर ऊन होते. लाहौल-स्पीती आणि किन्नौर या आदिवासी जिल्ह्यांमध्ये स्वच्छ हवामानामुळे लोकांना दिवसा थंडीपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, रात्रीथंडीची लाट कायम असून पारा उणे असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत गोठले आहेत. प्रसिद्ध हिल स्टेशन मनालीयेथेही पारा घसरत असून तो शून्याच्या जवळपास पोहोचला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे हवामानात बदल होऊन डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस पडू शकतो. शिमला हवामान केंद्राचे संचालक कुलदीप श्रीवास्तव यांनी आज सांगितले की, पुढील तीन दिवस स्वच्छ हवामानानंतर ८ आणि ९ डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात हवामान खराब राहील.
संबंधित बातम्या