Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. नैऋत्य मौसमी वारे माघारी फिरले आहेत. बहुतांश जिल्ह्यातील वातावरण कोरडे असून आता थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २७ ते २९ दरम्यान, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार दाना चक्रीवादळाची हे रात्री १.३० च्या दरम्यान उत्तर ओडिसा क्रॉस करून त्याची तीव्रता कमी झाली आहे. हे वादळ उत्तर ओडिसाच्या किनारपट्टीवर स्थित आहे. आज व उद्या महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर दिनांक २८ ऑक्टोबर रोजी मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडासहित हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक २९ ऑक्टोबरला विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्र वगळून उर्वरित जिल्ह्यांना मेघ गर्जना व विजांचा कडकडाटा सहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस आकाश कोरडे राहण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश सामान्यता ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या