Maharashtra Weather Update : राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. यामुळे राज्यात हवेचा दाब कमी होऊन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते आहे. यामुळे राज्यात एकीकडे तापमान वाढ तर दुसरीकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण, गोव्यात आज उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. प्रामुख्याने ३० एप्रिल ते ४ मे पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. तर मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, कोकणात पुढील आज उष्णतेची लाट येणार असल्याने यलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे तिथेही आज व उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या स्थरातील द्रोणीका रेषा आज पूर्व विदर्भापासून उत्तर केरळ पर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकावरून जात आहे. कोकण गोव्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील. आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर ३० एप्रिलला उष्ण व दमट हवामान राहील. यामुळे कोकणात आज व उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात आज व उद्या बऱ्याच ठिकाणी मेघकर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाला आज व उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात रविवारचे कमाल तापमान चाळीशीपार गेले आहे. ४१. ५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी पुण्यात दुपारपासून मोठा उकाडा जाणवत होता. तसेच किमान तापमान देखील चांगलेच वाढले आहे. वडगावशेरीला तर २९.९ किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर तळेगाव ढमढेरे येथे ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आज व उद्या आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३० एप्रिल ते चार मे आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
सध्या कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. बहुतांशी भागांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे.
हवामान विभागाने आज मराठवाडा विदर्भातील बीड, लातूर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या