Maharashtra Weather Update: राज्यात पुढील काही दिवसांत तपानंत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असून काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याच परिमाण राज्यावरील हवामानावर होणार आहे. त्यामुळे कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. पहाटे, संध्याकाळी व रात्री गारठा वाढला आहे. मुंबई, ठाणे व परिसरात गारठा जाणवत आहे. मात्र, दुपार नंतर उकाडा जाणवत आहे. दरम्यान, पुढील काही तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून यामुळे दिवसभर उष्णता व रात्री थंडी असे वातावरण राज्यात अनुभवायला मिळणार आहे.
राज्यात पुण्यासह काही जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. यात सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तापमानात २ ते ४ अंश डिग्री सेल्सियसने घट झाली असून गारठा वाढला आहे. पुण्यात कोरडे वातावरण असून गारठा वाढला आहे. सकाळी धुके पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसानंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात तापमान वाढलेले आहे. सकाळी थंडी तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीसाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी कमाल तापमान हे ३५.९ अंशांवर गेले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील तापमान वाढले आहे. शहरी भागांमध्ये हवेत धुक्याच प्रमाण वाढणार आहे.