Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. आज पासून पुढील १७ ते १८ मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड व लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या थरातील द्रोणीका रेषा ही मराठवाड्यापासून कोमोरियन भागापर्यंत जात आहे. महाराष्ट्राच्या चारही विभागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस बहुतेक ठिकाणी मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड व लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये तर दिनांक १३ मे रोजी मध्य महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आज व उद्या उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर १३ मे रोजी ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक १४ व १५ मे रोजी विदर्भातील बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे शहर व परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाट होऊन गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ मे रोजी आकाश अंशत: ढगाळ राहून मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज व उद्या पुणे सर्व परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक १३ ते १७ मे दरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जना व वीजांचा कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान, यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून म्हणजे रविवार ते गुरुवार पर्यंत मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या