Maharashtra WeatherUpdate : राज्यात उष्णतेचा कडाका वाढला असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सांगली, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस कोसळला. गारपिटीमुळे सांगली, नगरसह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर फळांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीने झोडपून काढले.पुण्यातही आज जोरदार पाऊस बरसलयाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
दरम्यान मुंबईत १५ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. गारपीट होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी प्रतितास असणार आहे.आगामी ५ दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तसेच अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर, पुणे, सांगली व अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात अवकाळीने हजेरी लावली. भर दुपारी कडक उन्हात वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. कोल्हापूर, सातारा परिसरात आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते मात्र पाऊस झाला नाही.या अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार सभांनाही फटका बसणार आहे.
हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी नुकतीच हवामानासंदर्भात एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,गारपीट आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगरमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या