Maharashtra Weather Update : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानावर अवकाळी पावसाचे गडद सावट आहे. आज (१३ मे) दुपार ३ नंतर पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज तर नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. वरील जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, जळगाव व बीड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
सकाळी हवेत गारवा असल्याने तसेच तापमान कमी असण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदान करावे तर इतरांनी दुपारपर्यंत मतदान करावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुपारी ३ नंतर ताशी ४० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा व वारा खंडित प्रणाली आज विदर्भ मराठवाड्यावरून जात आहे. कोकण गोव्यात कोकण गोव्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच तर पुढील दोन दिवस काही तर त्या पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी, परवा काही ठिकाणी तर त्या पुढील दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आज बऱ्याच उद्या उद्या व परवा काही ठिकाणी त्यापुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, गोवा, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गर्जनेसह विजांचा कर्कडाट ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली या जिल्ह्यांत १३ मे रोजी मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर १३ मे नंतर दोन दिवस मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना १३ मे रोजी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यात आज नांदेड लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना तर छत्रपती संभाजी नगर व जालना या जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह गारा आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. हिंगोली वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
विदर्भात आज अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यात विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात पुढील पाच दिवस अनेक ठिकाणी मेघ गर्जना विजांचा कडकडाट आणि ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पूर्ण आणि परिसरात १३, १५ आणि १६ तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना विजांचा कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १४ तारखेला विजांचा कडकडाट मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.