Maharashtra weather update : राज्यात मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारा, वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पाऊस होणार आहे. तर काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या पावसामुळे तापमानात देखील लक्षणीय घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक पश्चिमी विक्षोभ इराण करून उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत आहे. एक द्रविका रेषा उत्तर केरळ ते कोकणवर आहे. अँटि सायक्लॉन अथवा प्रति चक्रीवाताच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरून साउथ ईस्टर्ली अथवा साऊथ साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे राज्यात आद्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आज संध्याकाळपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि गोव्यामध्ये ठाणे रायगड येथे आज अति हलक्या पावसाची तर मध्य महाराष्ट्रात १ ते दोन मार्च पर्यंत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आज पासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. औरंगाबाद जालना व परभणी येथे मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद येथे दोन आणि तीन तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात एक आणि दोन तारखेला तूरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासहित पावसाची शक्यता आहे. अकोला अमरावती व बुलढाणा येथे दोन मार्चला गारपीट होण्याची ही शक्यता आहे. या काळात किमान तापमान लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आज दुपारपासून आकाश हळूहळू ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. एक व दोन मार्चला आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. एक तारखेला अति हलक्या पावसाचा अंदाज आहे. व गारपीट होण्याची ही संभावना आहे. तीन मार्च नंतर किमान तापमान चार डिग्री सेल्सियस पर्यंत घट तर कमाल तापमानात दीड डिग्री सेल्सियस पर्यंत घट अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या