Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. काल विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. तर पुण्यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आज देखील राज्यात (rain alert) वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार (IMD weather news) आज एक तीव्र पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून उत्तर भारतावर येत आहे. त्याबरोबर जोडलेली एक द्रोनिका रेषा अरबी समुद्र पर्यंत जात आहेत. त्यामुळे अरबी समुद्राकडून आर्द्रता मिळाल्यामुळे उत्तर व मध्य भारतातील सिस्टीमची तीव्रता वाढत आहे. या व्यतिरिक्त नैऋत्य राजस्थानामध्ये वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून प्रती चक्रवाती वाऱ्यांमुळे राज्यात आग्नेय वाऱ्यांबरोबर सुद्धा आर्द्रता येत आहे. यामुळे कोकण गोव्यामध्ये आज तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गारा देखील पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पुढील ४८ तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट सहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे व गारा पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या सिस्टीमचा प्रभाव राज्याच्या संपूर्ण भागामध्ये येत्या ४८ तासात राहील. राज्यांमध्ये किमान तापमानात तीन तारखेनंतर घट होण्याची शक्यता आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात येथे ४८ तासात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील. ३ तारखे नंतर किमान तापमानामध्ये जवळजवळ ४ डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही.
राज्यात शुक्रवारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पुण्यात देखील काल पहाटे आणि संध्याकाळी हलका पाऊस झाला. मुंबईत सध्या दमट आणि गरम हवामान असून दुपारी अंशतः ढगाळ वातावरण आहे. आज मुंबईसह ठाण्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज सकाळीही मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळीही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत अवकाळी पाऊस झाला. दक्षिण मुंबई, अंधेरी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि बोरिवलीसह शहरातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
संबंधित बातम्या