Maharashtra Weather Update: राज्यात सध्या उन, थंडी आणि पावसाचा खेळ सुरू आहे. सकाळी थंडी दुपारी उन आणि पाऊस असे काहीसे वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. राज्यातील हवामान कोरडे असतांना पुढील तीन दिवस थंडी वाढेल असा अंदाज असतांना आता राज्यात या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २२ ते २७ नोव्हेंबर पर्यंत राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज वर्ततवण्यात आला आहे. त्यामुळे पेटीत ठेऊन दीलेले रेनकोट आणि छत्र्या पुन्हा काढण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, पूर्वेकडील जोरदार वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. विशेष करून कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका, मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भमध्ये हलका पाऊस होणार असून २३ तारखेपासून २७ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात देखील २४ ते २७ दरम्यान, पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर वातावरण ढगाळ राहून थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालीच्या प्रभावामुळे पुणे शहरामध्ये ढगाळ हवामानासह वेगळ्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या प्रणालीमुळे दक्षिण आणि मध्य भागात प्रचंड आर्द्रता निर्माण झाल्यामुळे पाऊस झाला. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र. पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेला लागून असलेल्या समुद्रात नवीन प्रणाली तयार झाल्यामुळे पुन्हा पाऊस होणार आहे. राज्यात उत्तरेकडील थंड वारे वाहत असल्याने पुढील ४८ तासांत पुण्यासह महाराष्ट्राच्या उत्तर आणि मध्य भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तथापि, तामिळनाडूच्या किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर तयार झालेले वरचे हवेचे अभिसरण आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील श्रीलंकेच्या मध्यभागी असलेल्या चक्रिय स्थितीमुळे आग्नेय वारे येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होणार आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढून २३ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात या प्रणालीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (IITM) चे माजी शास्त्रज्ञ विनीत कुमार यांनी ट्विट करत २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात २५ ते २६ नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडेल. नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद येथेही पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी राज्यातील कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटाट आणि मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
२४ आणि २५ तारखेला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर २६ तारखेला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
२७ तारखेला कोकण गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.