Maharashtra weather update : देशात उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. दिल्लीचे तापमान ३ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले असून त्यात पुढील तीन दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात, धुक्यामुळे जणजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात मात्र, उलट परिस्थिती आहे, सकाळी थंडी आणि धुके, दुपारी गरम आणि पुन्हा रात्री थंडी नागरीक अनुभवत आहेत. राज्यातील वातावरण कोरडे राहणार असून कमाल तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ईशान्य मान्सून अथवा नॉर्थ ईस्ट मान्सून साउथ पेनिन्सुलावरुन १४ जानेवारीला माघारी परतला आहे. सध्या राज्यावर कुठलीही वेदर सिस्टम नाही. पश्चिम विक्षोभ देखील पश्चिम दिशेने पुढे सरकला आहे. राज्यात आकाश मुख्यत निरभ्र राहून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. १५ ते १६ तारखे दरम्यान कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सियस ने वाढ होऊ शकते. तसेच किमान तापमानात १ ते २ डिग्री सेल्सियसने घट होण्याचा अंदाज आहे. १८ तारखे नंतर आकाश मुख्यतः निरभ्र आकाश दुपारनंतर ढगाळ होऊ शकते.
हिंद महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढले असून, ते २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात कायम आहे. परिणामी राज्यासह दक्षिण भारत व मध्य भारतापर्यंत हवामानात बदल होतील. सध्या अरबी समुद्र व हिंदी महासागरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या आठवड्यात हवामानत बदल होऊ शकतात.
पुणे आणि परिसरात पुढील ४८ तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील व पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. १८ तारखेच्या सुमारास आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर ढगाळ होऊ शकते. पुण्यातील किमान तापमान शिवाजीनगरला १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात या आठवड्यात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असून, हवामान कोरडे असेल. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडी काही प्रमाणात पडू शकते. सकाळी व सायंकाळी हवेत गारठा असेल, दुपारी उष्णता जाणवणार आहे.
संबंधित बातम्या