Maharashtra IMD Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यात ढगाळ हवामान असल्याने उकाडा देखील वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. सकाळी थंडी तर दुपारी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवस राज्यात वातावरण कोरडे व ढगाळ राहणार असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहिती देशासह राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण असून त्यामुळे किमान तापमानाचा आकडा वाढला आहे. यामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून येथील थंडीत देखी घट झाली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात काही अंशांची वाढ झाली आहे. तर मुंबई व उपनगरांमध्ये धुके पसरत असल्याने दृश्यमानतेत घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही दाट धुके पडत आहे. पुण्यात सकाळी थंडी तर दुपारी गरमी असे वातावरण आहे.
केरळलगतच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये अरबी समुद्राच्या आग्नेयेला चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. तर, उत्तरेकडील राज्यांमध्ये मैदानी क्षेत्रांवरही वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं या भागांमध्ये थंडीचा कडाका कमी- जास्त होत आहे. या हवामानाचा परिणाम राज्यावर देखील होत आहे.
पुढील २४ तासांमध्ये राज्यात संमिश्र वातावरण राहणार असून सायंकाळच्या वेळी वाऱ्यामुळे घाट क्षेत्रामध्ये गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टी भागांमध्येही अंशत: गारठा राहणार आहे. तर दुपारी मात्र, उकाडा वाढणार आहे.
संबंधित बातम्या